मांडवगण फराटा – शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथे रात्री (दि.२७) करोनाचा रुग्ण आढळला असून, करोना मुक्त झालेल्या पूर्व शिरूर तालुक्यात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे.
याबाबत माहिती देताना मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.मंजुषा सातपुते- इसवे यांनी सांगितले की, ‘संबंधित तरुण हा बाभूळसर बुद्रुक येथून दररोज रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीत कामासाठी ये-जा करत होता.
दरम्यान त्या तरुणांमध्ये करोनाची काही लक्षणे आढळून आल्यानंतर त्याची करोना चाचणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईन केले आहे.
तसेच करोना बाधित तरुणाला लोणी काळभोर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
करोनाचा वाढता धोका लक्षात घेता व करोनाचे रूग्ण सर्वत्र सापडत असल्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आणि सोशल डिस्टंसिंग ठेवावे.
मास्क, सॅनिटायझरचा वापर वारंवार करावा. विनाकारण बाहेर जाऊ नये. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी केले आहे.