खासगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह
यवत(प्रतिनिधी ) – खुटबाव (ता. दौंड) येथील तरकारी मालाची वाहतूक करणारा 25 वर्षीय तरुण करोना पॉझिटिव्ह निघाला आहे, अशी माहिती दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. दौंड शहराबरोबर आता तालुक्याच्या ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या 25 वर्षीय तरुणाला दोन दिवसांपूर्वी हृद्यविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्याला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान तेथील एका खासगी लॅबमध्ये या तरुणाची करोना चाचणी करण्यात आली होती. या करोना चाचणीचा अहवाल रविवारी (दि.14) प्राप्त झाला असून या तरुणाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
या तरुणाच्या संपर्कातील त्याचे चार मित्र, आई-वडील आशा सहा जणांना पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच हा तरुण राहत असलेल्या घरापासून तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे डॉ. रासगे यांनी सांगितले.