नगर (प्रतिनिधी) – करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव केला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील आठवड्यात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग, लाचलुचपत विभागात करोनाने शिरकाव केला होता. आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यालयातील तो करोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी किती लोकांच्या संर्पकात आला याचा शोध प्रशासनाने सुरु केला आहे. तो कर्मचारी मुख्यालयात नेमणूकीस असल्याचे समजते.
राज्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये काहींचा मृत्यू झाल्या आहे. परंतू, नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकाही पोलिसांना करोना झाला नव्हता. परंतू, एक पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने आता जिल्हा पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.