नाशकात सरकारी कार्यालयात करोनाचा शिरकाव

नाशिक – नाशिकमधील सरकारी कार्यालयात करोनाचा शिरकाव केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिक जिल्हा परिषद आणि महापालिकेत करोनाने शिरकाव केला आहे. जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागाचा क्‍लार्क, तर महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यालाही करोनाची बाधा झाली. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे सुद्धा हायरिस्क झोनमध्ये आले आहेत. आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाला करोनाची लागण झाल्याने आयुक्तांसह इतर कर्मचारीदेखील हायरिस्क झोनमध्ये आले आहेत. सरकारी कार्यालये आता करोनाच्या विळख्यात सापडू लागल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

नाशिकमध्ये रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. जी यंत्रणा करोनाविरोधात लढत आहे. तेच आता करोनाच्या विळख्यात येताना दिसत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा फैलाव वाढला आहे. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 124 नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता शहरवासियांची चिंता वाढू लागली आहे.

दिवसागणिक नाशिक शहरात, ग्रामीण भागात करोना रुग्ण समोर येत असल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. त्यात नाशिक शहर आता करोना हॉटस्पॉट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागही चिंतेच्या गर्तेत अडकला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.