जामखेडमधल्या बँकेतही कोरोनाचा शिरकाव

मागील ५ दिवसपासून बँकेचे व्यवहार बंद

जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होताना दिसत असून गेल्या तीन दिवसांपासून जामखेड शहरासह तालुक्यात २९ कोरोनाबाधित आढळले आहे. त्यापैकी दोन जणांचा मुत्यू झाला तसेच काल शुक्रवारी रात्री रोजी उशिरा पुन्हा दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून गेल्या तीन दिवसापासून बँकेचे कामकाज बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जामखेड येथील ३१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल तीन दिवसांत पॉझिटिव्ह आले आहे. शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी विविध ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करावे. त्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी, अशी सूचना या वेळी करण्यात आली. विनाकारण कुणीही घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेचे शाखाधिकारी गेल्या १५ दिवसापासून आजारी असल्याने त्यांनी शहरातील ३ खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते मात्र गेल्या १० ते १२ दिवसापासून शाखाधिकाऱ्यानी आजारी असल्याने बँकेत जाणे टाळले होते. त्यानंतर त्यांनी नगर येथील खाजगी लॅब मध्ये स्वब तपासणीसाठी दिला असता दि २९ रोजी त्यांना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील बँकेतील ६ कर्मचाऱ्यांच्या व कुटूंबातील २ अशा ८ जणांच्या जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात रॅपीड अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी कुटूंबातील एक तर बँकेतील ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या कुटूंबातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, बँकेच्या शाखाधिकार्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सदर महिलेवर ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी दि २९ पासून बँकेचे कामकाज पूर्णपणे बंद केले आहे. कोरोनाची संपर्क साखळी तुटावी यासाठी प्रत्येकाने घरी राहणे आवश्यक असताना शहरात रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेक व्यावसायिक दिलेल्या वेळेनंतर छुप्या पद्धतीने व्यवसाय करत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.