लोणी काळभोर (वार्ताहर) -लॉकडाऊनच्या कालावधीत कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये पत्ते खेळणाऱ्यांपैकी दोघांना करोनाची लागण झाल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे.
कुंजीरवाडी येथे पत्ते खेळणाऱ्या अकरापैकी दोन जणांचा स्वॅबचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येताच, उर्वरीत नऊ जणांनी आपापले स्वॅब तपासणीसाठी विविध प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या नऊ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.
कुंजीरवाडी ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एका हॉटेलमधील एका खोलीत लॉकडाऊनच्या काळात परिसरातील काही जण पत्ते खेळण्यासाठी जमत होते. यापैकी दोन जणांना घशाचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांना उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले होते. या दोघांच्यावर उपचार चालू असताना, त्यांचे स्वॅब तपासणी अहवाल सोमवारी दुपारी आले. यात दोघेही करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या दोघांबरोबर पत्ते खेळणाऱ्या उर्वरित नऊजणांचा स्वॅबचा अहवाल उद्या (मंगळवारी) दुपारपर्यंत येणे अपेक्षित आहे. या नऊ जणांचा स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतरच पूर्व हवेलीमधील करोनाबाबतचे पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.