पिंपरी-चिंचवडमध्ये 24 तासांत चार रुग्ण “पॉझिटिव्ह’; एकूण संख्या 35
उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 23
पिंपरी – दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत “करोना’चे नवे चार रुग्ण आढळले आहेत. रविवारी रात्री उशीरा त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ते करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 35 झाली आहे. त्यामध्ये पहिले बारा रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 20 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून उर्वरित तीन रुग्णांवर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी (दि. 9) पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एका पुरुषाला करोनाची लागण झाली होती. आता या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या चार महिलांचे तपासणी अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात सलग पाच दिवसांपासून करोना विषाणूने बाधित रुग्ण सापडत आहेत. तर रविवारी एकाचा मृत्यू झाला आहे.
मार्च महिन्यामध्ये आढळलेले बारा रुग्ण करोनामुक्त झाले आहे. त्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एकही नवीन करोना रुग्ण आढळला नाही. मात्र दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमामधून परतलेल्या दोन जणांना 2 एप्रिल रोजी करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दिल्ली येथून आलेल्यांच्या “हाय रिस्क कॉन्ट्क्ट’मधील व्यक्तींना लागण होत असल्याचे समोर आले आहे.
59 संशयित वायसीएममध्ये दाखल
सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील 59 संशयित रुग्णांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील द्राव पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
ते 60 निगेटिव्ह
रविवारी 60 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ते 60 जण निगेटिव्ह आहेत. दरम्यान रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांनंतर सोमवारी सायंकाळपर्यंत मात्र पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.