पुणे – लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून कशा प्रकारे करोना साथीचा प्रसार होतोय, याबाबत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (आयसीएमआर) कडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला जात आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यात, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रश्नावली तयार केली असून त्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे.
अत्यावश्यक सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांचा सातत्याने नागरिकांशी संपर्क येत आहे, अशांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिले आहेत.
देशव्यापी लॉकडाऊन असले, तरी शहरातील अत्यावश्यक सेवांच्या संस्थासह त्यांचे कर्मचारीही सातत्याने आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यात पोलीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, हे काम करताना त्यांना करोनाची लक्षणे नसलेल्या बाधितांकडून संक्रमणाचा धोका अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांना या साथीची लागण कशी होते, तसेच संक्रमण नसलेल्यांकडून या आजाराचा प्रसार कसा होतोय, याचा अभ्यास “आयसीएमआर’कडून केला जात आहे.
त्यासाठी या कर्मचाऱ्यांना प्रश्नावली दिली जात असून सोबतच बाधित तसेच बाधित नसलेल्या कर्मचाऱ्यांची “आरटीपीसीआर’ आणि “ऍन्टिबॉडी’ची तपासणीही “आयसीएमआर’कडून करण्यात येत आहे.
प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण
“आयसीएमआर’ने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे. त्यात कर्मचारी किती वेळ कामावर असतात, कोणत्या ठिकाणी नागरिकांशी संपर्क येतो, सहकारी कर्मचारी किती सोबत असतात, जेवणाच्या वेळा-ठिकाण, जेवताना सोबत किती लोक असतात, नागरिकांशी कागद, इतर प्रकारचे साहित्य तसेच काही वस्तूंच्या हातळणीतून संपर्क येतो का, मास्क परिधान करतात का, मास्क कशा प्रकारचे वापरतात, संपर्कात येणारे नागरिक मास्क वापरतात का, अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे. त्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.