दुःखद : पाच महिन्यांची ‘परी’ करोनाशी सात दिवस लढली, पण अखेर…

नवी दिल्ली ( corona infection in children ) – देशात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेत बालकांमध्ये विषाणू संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते, या लाटेत मात्र करोना विषाणूचा संसर्ग बालकांसाठी देखील धोक्याचा ठरतोय.

राजधानी दिल्लीमधून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली असून विषाणू संसर्गामुळे एका पाच महिन्याच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तीव्र ताप जाणवत असल्याने परीचे पालक तिला तपासणीसाठी दिल्ली येथील एका बाल रुग्णालयात घेऊन गेले. मात्र येथे उपचार न झाल्याने तिला चाचा नेहरू बाल चिकित्सालयात दाखल करण्यात आले.

येथे ६ तारखेला तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला जीटीबी रुग्णालयात हलवले. परिस्थिती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

अखेर १२ मे ला तिचा करोनाविरोधातील लढा अपयशी ठरला. पाच महिन्यांच्या परीने जीटीबी रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.

परीच्या जाण्याने तिचे पालक शोकसागरात बुडाले असून परीवर सीमापुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, करोनाची संभाव्य तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे कुटुंबातील लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.