धक्कादायक! जीवंत महिलेला रूग्णालयाने केले मृत घोषित; नागपूर जिल्ह्यातील घटना

नागपूर – करोनाचा संसर्ग झालेल्या महिलेला जीवंत असताना रुग्णालयाने मृत घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार वर्धा मार्गावरील डोंगरगावजवळील आयजीपीए हाॅस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरच्या कोव्हिडायलय येथे शनिवारी घडला आहे. या प्रकारणी हिंगणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय.

सविस्तर माहिती अशी की, आशा चंद्रभान मून (वय 63, रा. काशीनगर, रामेश्वरी मार्ग) यांची प्रकृती खालावली असता त्यांना 9 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेआठ वाजता मून यांचा मुलगा अजय याला रुग्णालयातून तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा फोन आला. त्यानंतर अजय आणि काही नातेवाईक रुग्णालयात गेले असता त्यांना मृताची ओळख पटविण्यासाठी अंगावरील दागिने दाखविण्यात आले. मात्र ते दागिने पाहताच हे आईचे दागिने नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मृताचा चेहरा पाहता त्या आशा मून नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर कोविड वार्डमध्ये गेले असता अजयला त्याची आई जिवंत असल्याचे दिसले. अजयसाठी आणि नातेवाईकांसाठी हा सुखद धक्का होता. मात्र, रुग्णालयाने चुकीची माहिती दिल्यामुळे रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबाबत नातेवाईकांनी पोलिसांत योग्य कारवाईची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर मून यांना छत्रपती चौकातील न्युक्लिअस रुग्णालयात हलविण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.