मागील 20 दिवसांत सुमारे 120 कोटींचे नुकसान : पशुसंवर्धन विभागाचा अंदाज
जनजागृतीमुळे बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर
पुणे – चीनमधील “करोना’ विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यातच या विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यामुळे मांसाहाराची मागणी घटल्याने गेल्या 20 दिवसांत पोल्ट्री उद्योगाचे सुमारे 120 कोटींचे नुकसान झाले आहे, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, जनजागृतीमुळे गेल्या आठवड्यापासून मागणी वाढत असून, बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे म्हणाले, “महाराष्ट्राची ब्रॉयलर चिकनची मागणी दिवसाला 2 हजार 800 टनांची आहे. मात्र, “करोना’ विषाणूबाबतच्या अफवेमुळे आणि समाज माध्यमांमधील फिरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे गेल्या 20 दिवसांत चिकनची मागणी 600 टनांनी घटली आहे.
यामुळे 130 रुपये प्रतिकिलोच्या बाजारभावानुसार गेल्या 20 दिवसांत सुमारे 100 ते 120 कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने या अफवांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे बाजारपेठ पूर्वपदावर येत असून, गेल्या 20 दिवसांत 1 हजार 600 टनांपर्यंत कमी झालेली मागणी आता 2 हजार 200 टनांपर्यंत वाढली आहे. काही दिवसांत ही बाजारपेठ पूर्वपदावर येईल, असे आम्ही प्रयत्न करत आहोत.’
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची दररोजची चिकनची मागणी सुमारे 150 ते 200 टन एवढी असते. ती मागणी आता 100 टनांपर्यंत घटली आहे. तर चिकनचे 180 रुपये असणारे दर आता 120 रुपये आहेत. तर आमच्या जिवंत कोंबडीचे खरेदीचे दर 75 ते 80 रुपयांवरून, 40 रुपये प्रति किलोपर्यंत झाले आहे. मात्र, कोंबडीपासून “करोना’ विषाणूचा फैलाव होत नसल्याचे समोर येत असल्याने मागणी वाढत आहे.
– रुपेश परदेशी, संचालक, पुणे जिल्हा ब्रॉयलर असोसिएशन.