चिंचवड : महापालिकेच्या भोसरी येथील नवीन रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णानाने शुक्रवारी रात्री पलायन केले होते. या घटनेमुळे शहरात भीती निर्माण झाली होती.
मात्र या कोरोना बाधित रुग्णाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पुन्हा रुग्णलयात दाखल केले आहे. प्रशासनाकडे संबंधित व्यक्तीचा पत्ता असल्याने त्याच्या पत्त्यावर जाऊन पोलिसांच्या मदतीने वैद्यकीय विभागाने पलायन केलेल्या रुग्णाला परत आणले आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या पाल्याणाच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने भोसरी रुग्णालयाभोवती पोलिसांचा पहारा ठेवला आहे.
दरम्यान अहमदनगर आणि नागपूर मधील कोरोना बाधितांनी पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चार पोलीस कर्मचारी आणि एक अधिकारी रूग्णालय परिसरात पहारा देणार आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांना रुग्णालय परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान देशात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या राज्यात 38 वर पोहचली आहे. राज्य सरकारने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाग्रस्त जिल्ह्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.