करोनामुळे खर्च वाढला; उत्पन्नही वाढवा

स्थायी समिती अध्यक्ष रासने यांच्याकडून प्रस्ताव तयारीचे आदेश
महापालिकेचे आतापर्यंत 147 कोटी रुपये खर्च

पुणे – करोना विरोधातील लढ्यामध्ये महापालिकेने आतापर्यंत सुमारे 147 कोटी रुपये खर्च केले आहेत. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता विलगीकरण कक्ष उभारणी, औषधोपचार आणि अन्य खर्चासाठी पुढील काळात दरमहा अंदाजे 100 कोटी रुपये लागणार आहेत. सुदैवाने प्रामाणिक करदात्यांनी आतापर्यंत मिळकतकरापोटी 673 कोटी रुपये महापालिकेकडे जमा केले असून, जीएसटीच्या तीन महिन्यांच्या अनुदानापोटीही राज्य सरकारने 460 कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून उत्पन्न वाढीचे प्रस्ताव प्राधान्यक्रमाने मंजुरीसाठी ठेवावेत, असे निर्देश प्रशासनाला दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

करोनाबाधितांच्या उपचारावर आणि उपाययोजनांवर आजपर्यंत महापालिकेचे सुमारे 147 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आगामी काही महिन्यांतही खर्च उचलण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. राज्य सरकारकडे जीएसटीच्या थकबाकीसाठी पाठपुरावा केला असता सुरुवातीचे दोन महिने टप्प्याटप्प्याने पैसे देणाऱ्या राज्य सरकारने नुकतीच 460 कोटी रुपये जीएसटी रक्कम थकबाकीसह दिली आहे.

जूनपर्यंत 673 कोटी रुपये उत्पन्न महापालिकेला मिळकतकरातून मिळाले आहे. मागील वर्षीपेक्षा ते 90 कोटी रुपयांनी कमी आहे. अंदाजपत्रकात सुचवलेले उत्पन्न वाढीचे प्रस्ताव लवकरात लवकर मान्यतेसाठी ठेवून त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मिळकतकरासाठीच्या काही योजनांचा समावेश आहे. त्यानुसार कार्यवाही झाल्यास आर्थिक वर्ष अखेरपर्यंत 7 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा दावाही रासने यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.