Corona । ब्राझीलमधील आकडेवारीमुळे जगाच्या चिंतेत भर; करोनाबाधित तरुणांना…

रिओ दे जनेरिओ – करोना विषाणू संकटाने अवघ्या जगाला अक्षरशः मेटाकुटीस आणलंय. अत्यंत संसर्जन्य असलेल्या या विषाणूची बाधा झाल्याने आतापर्यंत जगभरातील लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागलेत तर अनेक जण अद्यापही याचा सामना करत आहेत. करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आता विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतोय. 

करोनाच्या दुसऱ्या लाटेने ब्राझीलच्या आरोग्यव्यवस्थेला गुढग्यावर आणलं असून येथे दररोज हजारो मृत्यू होत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच माध्यमांमध्ये झळकले होते. अशातच आता ब्राझीलमधून अशीच एक संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी धक्कदायक आकडेवारी समोर येत आहे.

ताज्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये करोनामुळे अतिदक्षता विभागात उपचारांची गरज भासणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ५२.२ टक्के रुग्ण हे ३९ वर्षांच्या आतील आहेत. ही आकडेवारी देशात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या वृद्ध रुग्णांपेक्षाही जास्त आहे. या आकडेवारीमुळे करोना विषाणूचा धोका वृद्धांसोबतच तरुणांना देखील असल्याचे स्पष्ट होते.

ब्राझीलमध्ये सध्या ३९ वर्षे अथवा त्याखाली वय असणारे ११ हजारांहून अधिक तरुण अतिदक्षता विभागात उपचार घेतायेत. ब्राझील येथील आरोग्यविषयक तज्ज्ञ एडर्लोन रेझेंडे यांनी याबाबत बोलताना, “यापूर्वी या वयोगटातील रुग्णांना करोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यांना सौम्य लक्षणं जाणवत. त्यांना अतिदक्षता विभागात उपचार घेण्याची गरजही पडत नसे. मात्र आता हे चित्र बदलले आहे.” अशी माहिती दिली.

दरम्यान, ब्राझील येथे वृद्धांमधील गंभीर रुग्णांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. यामागे वृद्ध लोकांना देण्यात आलेली करोना लस हे एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे अधिक तरुण रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तरुणांना देखील करोना लस देण्याची गरज असल्याचे मत आरोग्यविषयक तज्ज्ञ व्यक्त करतायेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.