भारतातील औषध कंपन्यावर ‘करोना’चा परिणाम?

चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर परिणाम होणार

पुणे – भारतात तयार होणाऱ्या बऱ्याच औषधांचा कच्चा माल चीनमधून आयात होतो. मात्र, चीनमध्ये “करोना’ व्हायरसमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कच्च्या मालावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्याचा भारतात तयार होणाऱ्या औषधांवरही परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

याबाबत औषध क्षेत्रातल्या कंपन्यांनी सांगितले, गेल्या वर्षी भारताने चीनमधून औषधांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची 2,405 दशलक्ष डॉलर्सची आयात केली होती. अशा एकूण आयातीत चीनमधून होणाऱ्या आयातीचा वाटा 67 टक्के इतका आहे. त्यामुळे चीनमधील घडामोडींकडे भारतातील औषध क्षेत्रातील उद्योगांचे लक्ष लागले आहे. सरकारलाही या घडामोडींची कल्पना देण्यात आलेली आहे.

यातून मार्ग कसा काढायचा, याबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे भारतातील औषधी कंपन्यांची संघटना असलेल्या आयपीएचे सरचिटणीस सुदर्शन जैन यांनी सांगितले. सध्या भारताकडे 3 महिने पुरेल एवढा कच्च्या मालाचा साठा आहे. तीन महिन्यांत परिस्थिती सुधारली नाही, तर मात्र भारताला पर्यायी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मात्र, तसे झाले नाही तर भारतीय औषध उद्योगाच्या उलाढालीवर परिणाम होऊ शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.