कोरोनाचा ‘द ग्रेट भारत सर्कस’ला फटका

* आर्थिक गणित बिघडल्याने कलाकार व प्राण्यांचे हाल  * वाघोलीत नुकतीच सुरू झाली होती सर्कस

वाघोली  (प्रतिनिधी) : कोरोनाने देशात हाहाकार माजवला असताना या संकटाचा सामना सर्वच नागरिक करत आहेत. अशातच राज कपूर यांच्या ‘जीना यहा मरणा यहा’ या गाण्याला अनुसरून सर्कशीच्या तंबूत आपली कला दाखविणारे कलाकार, प्राण्यांना देखील लॉकडाऊनच्या संकटात आर्थिक फटका बसला आहे. हाताला काम नसल्याने पोटाला आर्थिक चिमटा घेऊन जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

पुणे नगर महामार्गालगत वाघोली मध्ये एक महिन्यापुर्वी द ग्रेट भारत ही सर्कस दाखल झाली होती. सर्कशीचा तंबू ठोकून आणि जाहिरात करून झाल्यानंतर काही दिवसातच कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आणि लॉकडाऊन झाला. याचा मोठा फटका सर्कशीच्या आर्थिक परिस्थितीला बसला आहे. सर्कसमध्ये कलाकार, घोडे, उंट, इमू, श्वान असा मोठा ताफा आहे. यात कुणी महाराष्ट्रात, मणीपूर, आसाम, केरळ तर काही विदेशातील कलाकार आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्कशीतील कलाकार आपल्या जीवाची बाजी लावत लोकांचे मनोरंजन करतात मात्र लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांवर कोरोनामुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांनी एक हात मदतीचा पुढे करुन कलाकारांना मदत करण्याचे आवाहन सर्कस मधील कलाकार करत आहेत.नुकतीच वाघोली येथील चिराग सातव पाटील यांनी या सर्कस मधील कलाकारांना किराणा साहित्याचे वाटप केले होते.

” देशात सर्कस व्यवसाय हा खूप जुना आहे. अनेक अडचणी मुळे देशात हातावर मोजण्या एवढ्याच सर्कशी आज सुरू आहेत. परंतु कोरोना मुळे सर्कसचे कंबरडे मोडले आहे. सर्कसच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे मोठे संकट ओढवले आहे. ही कला जतन ठेवायची असेल तर सरकारने सर्कसकडे लक्ष द्यावे ”
उमेश आगाशे, सर्कस मालक 

” दुसऱ्यांच्या जीवनात हास्याचे आणि आनंदाचे क्षण उभे करणारी सर्कस मधील कलाकार मंडळी यांना समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासावी.”
राजेंद्र सातव पाटील ,माजी उपसरपंच वाघोली

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.