नवी दिल्ली – सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2020-21 ( एप्रील – मार्च) या काळात देशातील बऱ्याच भागात करोनाने धुमाकूळ घातल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे दैनंदिन जीवनाबरोबरच उद्योग व्यवसायावर परिणाम झाला होता. परिणामी 2020-21 या आर्थिक वर्षाचा विकास दर उणे 7.3 टक्के इतका नोंदला गेला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने आज ही माहिती जारी केली. 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर तीन टक्के इतका होता. आता तो उणे 7.3 टक्के झाला आहे. लॉकडाऊनमुळे सरलेल्या वर्षाचा विकास दर बऱ्याच प्रमाणात कमी होणार असल्याचे भाकीत बहुतांश विश्लेषकांनी आणि पतमानांकन संस्थांनी व्यक्त केले होते.
सरलेल्या वर्षात विकास दर मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरी आगामी वर्षाचा विकास दर मात्र दहा टक्क्यापर्यंत वाढणार असल्याचे भाकित व्यक्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने काही संकेत मिळत आहेत.
आज एप्रिल महिन्यातील पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर सरलेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील विकास दर ( अधिक) 1.6 टक्के इतका नोंदला गेला आहे.
सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बऱ्याच शहरांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या विकास दरावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. मात्र नंतरच्या तीन तिमाहीमध्ये विकास दर मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
त्यामुळे चालू वर्षाचा विकास दर दहा टक्क्यांच्या जवळपास सहज जाण्याची शक्यता आहे. विकासदर यावर्षीही मोठ्या प्रमाणात कमी होऊ नये याकरिता दुसऱ्या लाटेवेळी राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन करण्याऐवजी स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच क्षेत्राचे कामकाज काही प्रमाणात चालू राहिले.
चौथ्या तिमाहीपासून आशावाद
सरलेल्या पूर्ण वर्षाचा विकास दर जरी उणे 7.3 टक्के इतका घसरला असला तरी सरलेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी- मार्च 2020) आशावाद दिसून येऊ लागला आहे. सरकारने आज चौथ्या तिमाहीतची विकास दर आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या तिमाहीत विकास दर ( अधिक) 1.6 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या चार तिमाहीतही विकास दर कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तो गेल्या वर्षाप्रमाणे नकारात्मक राहणार नाही असे समजले जाऊ लागले आहे. आज जाहीर केलेली एप्रिल महिन्याची पायाभूत क्षेत्राची आकडेवारीही या शक्यतेवर शिक्कामोर्तब करीत असल्याचे दिसून येते. मात्र या तिमाहीत तिमाहीत विकास दर 18.3 टक्के इतका मोजला गेला आहे.