पुणे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा

पुणे – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या महाराष्ट्रातील मुंबई व पुणे ही महानगरे कोरोनाच्या हिटलिस्टवर आहेत. मुंबई व पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता कोरोना विषाणूने पुण्यातील अग्निशमन दलामध्ये प्रवेश केल्याचे वृत्त हाती आले आहे. पुणे अग्निशमन दलामध्ये ड्रायव्हरचे काम करणाऱ्या एका इसमास कोरोनाची लागण झाली आहे.

याबातच्या वृत्ताला मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दुजोरा दिला असून बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुणे अग्निशमन दलामध्ये कार्यरत असलेल्या या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या इतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची देखील तपासणी होणार आहे.

यापूर्वी पोलीस व सीआरपीएफमधील जवानांना कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत मात्र अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे बहुधा हे पहिलेच प्रकरण असावे. आता सदर इसमास कोरोनाची लागण नेमकी कोठून झाली याबाबतची माहिती देखील गोळा केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.