पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील केवळ करोनाबाधितांवरील उपचाराकरिता ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याने एमआयडीसीतील जवळपास तीन हजार उद्योगांना फटका बसला आहे. सुमारे 60 टक्के उत्पादन ठप्प झाले आहे. लॉकडाऊनच्या भीतीने गावी जाणाऱ्या कामगारांना थांबविताना उद्योजकांना नाकी नऊ येत असतानाच, कच्च्या मालाचा तुटवडा व आता ऑक्सिजनचा पुरवठाच बंद झाल्याने मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगांची चाके थांबली आहेत. परिणामी दररोज कोट्यवधींचा फटका बसत असल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून करोनाने शहरात थैमान घातले आहे. सद्यःस्थितीत शहरात करोनाची दुसरी लाट आहे. श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणाऱ्या करोनाबाधितांना ऑक्सिजनच्या माध्यमातून कृत्रिम श्वास दिला जात असून, शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयातील सुमारे 2200 रुग्णांचे प्राण ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. त्यातच मंगळवारी रात्री ऑक्सिजनचा तुटवडा भासला. मात्र, त्याची वेळेत पूर्तता झाल्याने अप्रिय घटना टळली. या पार्श्वभूमीवर सर्व ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून उत्पादित केला जाणारा ऑक्सिजन केवळ करोनाबाधितांवरील उपचाराकरिता वापरला जात आहे.
परिणामी उद्योगनगरीतील सुमारे 60 टक्के उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी ऑक्सिजन मिळत नसल्याने उद्योगांचे उत्पादन प्रकल्प बंद पडले आहेत.
काही दिवसांपूर्वी शहरातील बड्या कंपन्यांनी आपले उत्पादन कमी केले आहे. त्यातच “ब्रेक द चेन’अंतर्गत उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी असतानादेखील पोलीस कारवाईच्या भीतीने ही दुकाने उघडली जात नाहीत.
परिणामी लघुउद्योगांना कच्चा माल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. कडक लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगारांनी गावचा रस्ता धरला आहे. तर अनेकांना “दादा-बाबा’ करून त्यांचे स्थलांतर रोखताना उद्योजकांच्या नाकी नऊ आले आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर लघुउद्योगांमध्ये अत्यल्प उत्पादन सुरू आहे. या सर्व अडचणींवर मात करून कुठे लघुउद्योग ऑर्डर पूर्ण करण्यासाठी उभारी घेत होते, त्यातच ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने तीन हजार लघुउद्योगांचा श्वासच कोंडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
आता कुठे मनुष्यबळ उपलब्ध होत असताना कडक लॉकडाऊनच्या भीतीने बहुतांशी परप्रांतीय कामगारांनी पुन्हा घरचा रस्ता धरला आहे. आता ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने बहुतांशी लघुउद्योगांनी आपले उत्पादन बंद ठेवले आहेत. याचा दररोज कोट्यवधींचा फटका बसत आहे. अर्थव्यवस्था सावरणाऱ्या उद्योगांची फरफट थांबावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना