नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही असं राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनातर्फे एक निवेदन प्रसिद्ध करून, याची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, १३ एप्रिल रोजी ज्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचा आणि राष्ट्रपती भवनाचा कुठलाही संबंध नाही.
राष्ट्रपती कार्यालयाचे उप सचिव निमिष रुस्तगी यांनी एका निवेदनात म्हटले आहे कि, मध्य दिल्लीत १३ एप्रिल रोजी एका कोरोनाबाधिताचा कपूर रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा आणि राष्ट्रपती भवनाचा काही संबंध नाही. राष्ट्रपती सचिवालयातील एका कर्मचाऱ्याचा मृत व्यक्तीच्या कुटुंबाशी संबंध आला होता. याची माहिती मिळताच सदरील व्यक्तीच्या परिवारातील ७ सदस्यांना १६ एप्रिल रोजी विलगीकरण कक्षेत दाखल करण्यात आले होते. त्यांपैकी कोणालाही कोरोनाची बाधा झालेली नव्हती.
दरम्यान, देशभरात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, ३ हजार २५२ जण कोरोनमुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारने २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही भागात सूट दिली आहे.