वॉशिंग्टन/ लंडन : जगभरातील करोनाग्रस्त देशांमध्ये करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी वाढण्याचा वेग मंदावल्याचे चित्र दिसत आहे. या देशांमध्ये ज्या प्रमाणात गेल्या दोन आठवड्यांपूर्वी करोनाचे रुग्ण सापडत होते, त्या प्रमाणात आता हे रुग्ण सापडत नाहीत. त्याचा वेग मंदावल्याचे दिसते आहे.
ब्रिटनमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या दैनिक आकडेवारीनुसार, करोनाची लागण झालेल्या आणि उपचारादरम्यान रुग्णालयात मरण पावलेल्या लोकांची संख्या आज 596 ने वाढून 16,060 झाली आहे. तर इराणमधील बाधितांची संख्या 82 हजार आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 हजाराच्या पुढे गेली आहे. स्पेनमध्येही करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसते आहे.
करोनाच्या साथीच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने रमजानसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. सामाजिक आणि धार्मिक मेळावे रद्द करण्याबाबत गांभिर्याने विचार केला पाहिजे आणि सार्वजनिक एकत्रीकरणे घेण्यावर मर्यादा, नियोजनात सुधारणा करणे, पुढे ढकलणे, रद्द करणे किंवा पुढे जाण्याचा निर्णय प्रमाणित जोखीम मूल्यांकन व्यायामावर आधारित असावा, असे त्यात म्हटले आहे.