‘भाजपा आमदारांनी दिलेला करोना निधी उघड करावा’

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची भाजपावर टीका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना सुविधा दिल्याचे श्रेय लाटणाऱ्या भाजपाच्या दोन्ही आमदारांनी करोनासाठी आतापर्यंत किती निधी दिला ते जाहीर करावे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदाराने आतापर्यंत 41 लाख 50 हजारांचा निधी दिल्याचे त्यांनी जाहीर केले.

महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीवर करोनाबाबत टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांमध्ये कोणतेही राजकारण न आणता महापालिकेला 1700 कोटी रुपयांची विकासकामे करण्यास मान्यता दिली.

शासनाने 33 टक्के खर्चाचे धोरण ठरविलेले असतानाही विकासकामांना अडथळा नको म्हणून स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी या कामांना मान्यता दिली. यानंतरही सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीवर व राज्य सरकारवर टीका केली. ही टीका त्यांना कोणीतरी करायला लावली ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्याच्या सांगण्यावर टीका करणारे पदाधिकारी या शहराला मिळणे हे शहराचे दुर्भाग्य आहे, असा घणाघातही वाघेरे यांनी केला.

राष्ट्रवादीने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांमुळे सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा उघडा पडला असून करोनाचे वाढते रुग्ण हे भाजपचे अपयश असल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे. इतरांवर टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी करोना कसा आटोक्‍यात येईल व मृत्यू कसे कमी होतील, याकडे लक्ष द्यावे, असा टोलाही वाघेरे यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.