नगर । करोनाचा पुन्हा महाविस्फोट

आज अवघ्या एकाच दिवसात 2,654 नवे बाधित; मागील आठच दिवसांत वाढले 15,183 नवे रुग्ण

नगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूने आज पुन्हा एकदा  नगर जिल्ह्यात महाविस्फोटच घडविला आहे. शनिवार व रविवारच्या वीकेंड लॉकडाऊनमुळे काल (सोमवारी) नगरकरांना थोडासा दिलासा मिळाला. तथापि, आज पुन्हा एकदा करोना विषाणूने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील तब्बल 2 हजार 654 जणांना आज करोना विषाणूने कवेत घेतले आहे.

त्यातील बहुतेकांना आता रुग्णालयात भरती करता येत नसल्याची आगतिकता नातेवाईक व्यक्त करत आहेत. नगर शहरातील सर्वच रुग्णालये आता हाऊसफुल्ल आहेत. एकाही खासगी अथवा जिल्हा सरकारी रुग्णालयात देखील साधा किंवा ऑक्सिजन बेड शिल्लक नाही. शहरात काही ठिकाणी कोविड रिकव्हरी सेंटर उघडण्यात आले आहेत. मात्र, तेथे जाण्यास रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईकही फारसे इच्छूक दिसत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची आजची धावसंख्या नगरकरांच्या काळजाचा ठोका चुकविणारी आहे. असे असताना नगरकर अजुनही शहाणे होण्याचे नाव घेत नसल्यानेच आता उघड्या डोळ्यांनी करोनाबळी पाहण्याची वेळ नगरकरांवर आली आहे. श्रीरामपूरमधील एका तरुणासह तिघाजणांचा काळ केवळ ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने बळी गेला. त्यातील एकाने तर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे नागरीक शहाणे झाल्याशिवाय व निर्बंधांचे स्वत:हून पालन केल्याशिवाय करोनापासून मुक्ती नसेलच, असेच चित्र आहे.

दरम्यान, आज जिल्ह्यात जिल्ह्यात आज 1352 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 5 हजार 101 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.08 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 2654 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 14,264 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 651, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 582 आणि अँटीजेन चाचणीत 1421 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 118, अकोले 72, जामखेड 19, कर्जत 44, कोपरगाव 09, नगर ग्रामीण 30, नेवासा 07, पारनेर 45, पाथर्डी 36, राहता 30, राहुरी 11, संगमनेर 98, शेवगाव 28, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 36, कँटोन्मेंट बोर्ड 30, मिलिटरी हॉस्पिटल 07 इतर जिल्हा इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 298, अकोले 05, जामखेड 05, कर्जत 06, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 35, नेवासा 19, पारनेर 04, पाथर्डी 03, राहाता 81, राहुरी 14, संगमनेर 30, शेवगाव 02, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 25, कँटोन्मेंट बोर्ड 27 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1421 जण बाधित आढळुन आले. मनपा 60, अकोले 68, जामखेड 09, कर्जत 112, कोपरगाव 275, नगर ग्रामीण 40, नेवासा 88, पारनेर 70, पाथर्डी 75, राहाता 104, राहुरी 126, संगमनेर 91, शेवगाव 62, श्रीगोंदा 85, श्रीरामपूर 139, कॅन्टोन्मेंट बोर्ड 14 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 568, अकोले 52, जामखेड 02, कर्जत 02, कोपरगाव 61, नगर ग्रामीण 90, नेवासा 17, पारनेर 10, पाथर्डी 45, राहाता 195, राहुरी 77, संगमनेर 97, शेवगाव 20, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 75, कॅन्टोन्मेंट 24 आणि मिलिटरी हॉस्पिटल 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.

करोना अपडेटस
बरे झालेली रुग्ण संख्या:1,05,101
उपचार सुरू असलेले रूग्ण:14264
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1334
एकूण रूग्ण संख्या:1,20,699

नातेवाईकही वाटत आहेत करोना विषाणूचा महाप्रसाद…!

मागील आठ दिवसांत नगर जिल्ह्यात तब्बल 15 हजार 183 नवे करोनाबाधित सापडले. त्यामुळे सर्वांनीच दखल घ्यायला हवी. मात्र, बहुतेक रुग्णालयांत अ‍ॅडमीट असलेल्या रुग्णांचे नातेवाईक विशेष काळजी घेताना दिसत नाहीत. जिल्हा शासकीय रुग्णालयात थेट रुग्णाजवळ काही वेळ बसून पुन्हा बाहेर बिनधास्त फिरणार्‍या नातेवाईकांनाही आता आवरावे लागणार आहेत. एकतर वैद्यकीय यंत्रणेने नातेवाईकांना थेट रुग्णाजवळ जाण्यास प्रतिबंध करावेत किंवा नातेवाईकांनीच योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. परंतु, जिल्हा शासकीय रुग्णालयातील आजचे चित्र काही वेगळेच असल्याचे दिसले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.