एकाच दिवसात तब्बल 35 रुग्ण; शनिवार पेठेत 21 रुग्ण
सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहरात एकाच दिवसात करोनाचे तब्बल 35 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची धावाधाव झाली. राजलक्ष्मी टॉकीजच्या पिछाडीला असणाऱ्या शनिवार पेठेतील घरकुल योजनेच्या एकाच इमारतीत तब्बल 21 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली.
शनिवार पेठ, गुरूवार पेठ, मंगळवार पेठ, देवी चौक, प्रतापगंज पेठ, बुधवार पेठ, सोमवार पेठ या सात पेठांमध्ये 35 रुग्ण आढळले. बुधवारी रात्रीच्या अहवालात शनिवार पेठेत शासकीय घरकुल योजनेच्या एकाच इमारतीत 20 आणि पालिकेने घेतलेल्या वैद्यकीय शिबिरात काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या इमारतीत शासकीय कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असून केवळ सोशल डिस्टन्सिंग नसल्याने येथे करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या इमारतीतील पहिला रूग्ण चार ऑगस्ट रोजी आढळला होता.
इमारतीतील घरकुलांची रचना अगदीच एकमेकांना खेटून असल्याने सुरक्षित अंतराची अडचण झाली. आरोग्य यंत्रणेने धोका ओळखून रॅपिड टेस्ट केल्या. त्यामध्ये दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कोविड कक्ष प्रमुख प्रणव पवार यांनी सांगितले. शनिवार पेठेत 54 वर्षीय पुरूष, गुरूवार पेठेत 43 व 53 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेत 36 वर्षीय पुरुष, देवी चौकात 75 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठेत 50 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, बुधवार पेठेत 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठेत 68 वर्षीय पुरुष, गोडोलीत 37 वर्षीय पुरुष, केवळ सातारा असा पत्ता दिलेले 50 वर्षीय महिला, 50, 57, 58 वर्षीय पुरुष असे 35 रुग्ण शहरात आढळले. पालिकेच्या नोंदीप्रमाणे गुरूवार पेठ व रामाचा गोट येथे एक पुरूष व एक महिला आढळल्याचे सांगण्यात आले.
सातारा तालुक्यात 41 रुग्ण
सातारा तालुक्यातील 16 गावात 41 रुग्ण आढळून आले. धावडशी, नागठाणे, वासोळे, अतीत या चार गावांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. अतीतमध्ये सहा पुरुष व चार महिला बाधित आढळल्या. वासोळे गावात दोन पुरुष, एक महिला, नागठाणे येथे दोन महिला, एक पुरुष, धावडशी गावात दोन महिला, दोन पुरुष, शिवथरमध्ये तीन महिला, एक पुरुष, सैदापूरमध्ये एक पुरुष, डबेवाडीत एक महिला, वाढेफाटा येथे एक महिला, भरतगाववाडी येथे एक महिला, जकातवाडी येथे एक पुरुष, संभाजीनगर व संगमनगर येथे प्रत्येकी दोन पुरुष, निगुडमाळ येथे एक पुरुष, शाहुपुरीत एक पुरुष व पाच महिला असे 41 रुग्ण आढळल्याचे सातारा पंचायत समितीच्या आरोग्य सूत्रांनी सांगितले.