मास्को – ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी लस आधीच उपलब्ध असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र आता लसीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे मत जगभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच या वर्षात मे महिन्याच्या अखेरपर्यत साथीचा रोग हंगामी साथीच्या रूपात संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
एपिडेमियोलॉजिस्ट आणि रशियाचे माजी मुख्य सॅनिटरी डॉक्टर गेनाडी ओनिश्चेंको यांच्या मते, सर्व प्रतिबंधात्मक उपाय आणि लसीकरण मोहिमेचे पालन केल्यामुळे मे महिन्यापर्यंत करोना हा साथीचा रोग संपुष्टात येईल, असे वृत्त एका न्यूज एजन्सीने दिले आहे.
मे पर्यंत बराच वेळ आहे जर आपण आता जे आवश्यक आहे ते केल्यास विषाणूची गती मंदावली किंवा नियंत्रणात तरी आले पाहिजे, असेही ते म्हणाले. लसी आधीच तयार झाल्यामुळे आता घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र आता लसीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.
रशियन अकादमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष अलेक्झांडर सर्गेयेव्ह यांनी देखील सांगितले की, सध्याची कोविड-19 साथीची रोगराई 2022 पासून हंगामी महामारीमध्ये बदलेल, असे अहवालात म्हटले आहे.
मला अपेक्षा आहे की कोविड-19 साथीचा रोग फ्लू सारख्या हंगामी महामारीत बदलेल. मला असे म्हणायचे आहे की सध्याची परिस्थिती 1960 च्या दशकासारखी दिसते, जेव्हा हॉंगकॉंग फ्लूच्या साथीचे खूप गंभीर परिणाम झाले होते, तेव्हा बरेच लोक गंभीर आजारी होते. परंतु लस आणि औषधे योग्य वेळेत तयार करण्यात आली आणि आम्ही आता 60 वर्षांपासून फ्लूसोबत जगत आहोत आणि त्याची जवळपास सवय झाली आहे.
आज कोविडचे जे काही घडत आहे ते काही बाबतीत सारखेच दिसते. एक गंभीर महामारी, भीती, लसींची निर्मिती आणि औषधांचा विकास. जर चांगले, विश्वासार्ह औषधोपचार असतील तर आपल्याला हा आजार सामान्य फ्लूसारखा भासू लागेल,, असेही सर्गेयेव्ह म्हणाले.