मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता या करोनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या आधी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक करोनामुक्त झाले. पण आता राज यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा करोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही करोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन प्रक्रीया करण्यात आली होती. तसेच शिवसेना भवन एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.