#corona : ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंटवर भर द्या

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचना; करोना परिस्थितीचा घेतला आढावा

नगर – करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा. तसेच, बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांच्या तत्काळ चाचण्याकरून उपचार सुरू होणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देऊन रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन येत्या महिना अखेरीस होणारी संभाव्य रुग्णसंख्या विचारात घेऊन नियोजन करावे, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केल्या.

नाशिक विभागीय आयुक्त गमे आणि राज्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.

गमे म्हणाले, की जिल्ह्याच्या काही भागात विशेषता महानगरपालिका, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय, ज्याठिकाणी सध्या रुग्णवाढीचा वेग कमी दिसत असला तरी आगामी काळात तो वाढणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे, असे सांगून गमे यांनी राज्य शासनाने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, की संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचण्या वाढवणे अत्यावश्यक आहे. खासगी रुग्णालयात विनाकारण ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर बेडस् रुग्णांनी अडवल्या गेल्या नाहीत ना हे तपासणी करा. उपचार आवश्यक असलेल्या व्यक्तींना ते मिळण्याची गरज आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला गरज नसेल तर ’स्टेप डाऊन’ याप्रमाणे त्याला कोविड केअर सेंटर अथवा इतरत्र शिफ्ट करून दुसर्‍या रुग्णाला ते बेडस उपलब्ध करून दिले पाहिजे.

कोविड केअर सेंटरची पाहणी
विभागीय आयुक्त गमे, डॉ. सुधाकर शिंदे यांनी आढावा बैठकीनंतर महानगर पालिकेच्या नटराज हॉटेल येथील कोविड केअर सेंटर भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बालिकाश्रम रस्त्यावरील महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या भागाला भेट देऊन नागरिकांशी संवाध साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दररोज पाच हजार चाचण्या अपेक्षित
जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी अतिरिक्त एक्स्ट्रॅक्टर घेऊन ती वाढवावी. सध्या तीन हजार दैनंदिन चाचण्या होत आहेत. ही संख्या किमान पाच हजारांपेक्षा अधिक होणे अपेक्षित आहे. जिथे बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, तेथे रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्या वाढवा, अशा सूचना गमे यांनी दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.