पुणे – करोनाची लक्षणे दिसल्यानंतरही रुग्ण पुढे येत नसल्याने तसेच अन्य गंभीर आजारांचे रुग्ण करोनाच्या विळख्यात सापडत असल्याने शहरातील गंभीर रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाची कसरत होत आहे. या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होत आहे.
करोनाबाबत पालिका देत असलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार, शहरात दि.25 एप्रिल रोजी करोनाचे सुमारे 45 रुग्ण गंभीर होते. त्यात काही व्हेंटिलेटरवर, तर काहींना ऑक्सिजन देण्यात येत होता. हा आकडा दि.5 मे रोजी 61, त्यानंतर 15 मे रोजी तो 144, तर 25 मे रोजी तो 175 वर गेला आहे. त्यामुळे एका बाजूला करोना रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर तसेच अत्यवस्थ रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे.
गंभीर रुग्णांचा आकडा वाढणार
जून अखेरीस शहरात करोना गंभीर रुग्णांचा आकडा 1,705 वर जाईल, असा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाने काढला आहे. यात 974 जणांना ऑक्सीजनची सुविधा असलेले बेड, 487 जणांना आयसीयू तर 244 जणांना व्हेंटिलेटरची गरज भासेल. त्या अनुषंगाने उपाय सुरू आहेत, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.