Lockdown Effect | नव्या निर्बंधांचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारने 15 दिवसासाठी निर्बंध लागू केले आहेत. त्याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर बराच परिणाम होऊ शकतो असा इशारा उद्योजकांच्या संघटनांनी दिला आहे.
बुधवारी महाराष्ट्रात निर्बंध लागू करण्याअगोदर महाराष्ट्र सरकार बरोबर आम्ही चर्चा केली होती. या चर्चेमध्ये कोणत्या उपाययोजना केल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याचा आराखडा दिला होता, असे फिक्‍की या उद्योजकांच्या संघटनेने म्हटले आहे.

निर्बंधमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होणार आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी आगामी काळामध्ये वेगात उपाययोजना कराव्या लागणार आहेत. या संदर्भात आम्ही काही माहिती महाराष्ट्र सरकारला उपलब्ध केली आहे.

महाराष्ट्रात बऱ्याच कंपन्या उत्पादन तयार करतात. या उत्पादनांचा पुरवठा इतर राज्यात नियमितपणे सुरू आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये पुरवठा होत नाही. त्याचा परिणाम कंपन्यांच्या कामकाजावर आणि महाराष्ट्रातील ग्राहकावर होणार आहे. फिक्‍कीच्या महाराष्ट्र अध्यक्ष सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी सांगितले की, किरकोळ विक्रीवर बंधने घालण्यात आल्यामुळे मागणी कमी होईल. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यासाठी 30 एप्रिलनंतर असे निर्बंध कायम राहणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे.

मोठ्या उद्योगाचा भांडवली पाया मजबूत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे धक्के मोठे उद्योग सहन करू शकतात. परंतु छोट्या उद्योगांवर याचा जास्त परिणाम होतो. यासाठी छोट्या आणि अनौपचारिक उद्योग क्षेत्रांना काय मदत करता येईल या संदर्भात महाराष्ट्र सरकार बरोबरच बड्या कंपन्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

या उद्योगांना विजेचे बिल, जागेचे भाडे, परवाना शुल्क आणि इतर शुल्कामध्ये काय मदत करता येईल याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादीसारख्या क्षेत्रांमधील उद्योजकांना सध्याच्या परिस्थितीत कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी मदतीची गरज असल्याचे भारतीय उद्योग महासंघाचे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.