सेलिब्रिटींच्या बिदागीवर पाणी…

गोविंदांच्या दहीहंडी फोडण्याच्या आनंदावर विरजण

पिंपरी : अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवालाही करोना संसर्गाचे ग्रहण लागले आहे. सावर्जनिक दहीहंडीला यंदा परवानगी नसल्याने दहीहंडी फोडण्याचा आनंद गोविंदांना लुटता येणार नाही. दहीहंडी उत्सवाला आकर्षण निर्माण करण्यासाठी लाखो रुपयांची बिदागी देऊन बोलाविण्यात येणाऱ्या सेलिब्रिटींनाही बिदागीपासून मुकावे लागणार आहे.

दरवर्षी दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. विविध मंडळ, संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांकडून शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव भरविण्यात येतो. मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्यात येते. मंडळ, संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांकडून उंचावर दहीहंडी बांधून गोविंदा पथकांना दहीहंडी फोडण्यासाठी निमंत्रित केले जाते. गोविंदा पथकांकडून पुरेशा तयारीने दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक थर लावले जातात.

उंचावर दहीहंडी असल्याने आठ ते दहा थर उभारावे लागतात. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उत्साह पाहण्यास मिळतो. मात्र, यंदा करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरू असल्याने दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी नाही. पर्यायाने, गोविंदा पथकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. उत्सवच होणार नसल्याने बक्षिसांची लयलूट नाही की सेलिब्रिटींचे आकर्षण नाही.

मानधनाला फटका

शहरात विविध मंडळे, संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांकडून भरविण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी सेलिब्रिटींना निमंत्रित केले जाते. मंडळांच्या कार्यकर्त्यांना, राजकीय पुढाऱ्यांना या सणाचा “इव्हेंट’ म्हणून फायदा घेता येतो. त्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करता येते. सेलिब्रिटींचा चाहता वर्ग, त्यांच्या मानधनाची अपेक्षा यानुसार सरासरी 50 हजारापासून पाच लाख रुपयांपर्यंतची बिदागी मराठी कलाकार घेतात. हिंदीतील कलाकार हे त्यापेक्षा जास्त मानधन घेतात. यंदा दहीहंडीच होणार नसल्याने सेलिब्रिटींच्या मानधनाला फटका बसणार आहे.

“दहीहंडी उत्सव होणार नसल्याने यंदा कलाकारांचे नुकसान होणार असले तरीही करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवाला परवानगी न देण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे.”
– सावनी रवींद्र, गायिका.

“करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन अंतर्गत कलम 144 अनुसार 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू आहे. त्यामुळे लग्न आणि अंत्यविधी वगळता अन्य कार्यक्रमांना परवानगी नाही. पर्यायाने, दहीहंडी उत्सवाला देखील परवानगी दिलेली नाही.”
– आर.आर.पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.