नवी दिल्ली : करोनामुळे शेअर बाजारात आलेल्या मंदीचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनाही झाला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल 44 हजार कोटी रूपयांचा घट झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईमनुसार मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 11.68 टक्क्यांची घट झाली असून ती आता 42.2 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. एका दिवसात त्यांना 5.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला झालेले गेल्या 11 वर्षातील हे सर्वात मोठे नुकसान आहे. यामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिले स्थान त्यांना गमवावे लागले आहे.
सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्येही घसरण झाल्याचे पहायला मिळाले होते. सौदी अरेबिया आणि रशियादरम्यान कच्च्या तेलावरून दरयुद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 31 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात नंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण रिलायन्स इंडस्ट्रीजवरही परिणाम करेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम त्याच्या जीआरएमवर होईल. डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा जीआरएम 9.2 डॉलर प्रति बॅरल होता. रिलायन्सच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर रिलायन्सचे बाजार मूल्य 7 लाख 5 हजार 655.56 कोटी रूपयांवर आले आहे.