नवी दिल्ली : करोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामुळे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मार्च तिमाहित अॅमेझॉनचा नफा २९ टक्क्यांनी कमी होऊन तो २५४ कोटी डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित अॅमेझॉनला ३५६ कोटी डॉलर्सचा नफा झाला होता. यावेळी त्यांना तब्बल १०२ कोटी म्हणजेच अंदाजे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मार्च महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्येही पाच टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
गेले तीन महिने अनेक ठिकाणी लॉकडाउनमुळे लोकं आपल्या घरांमध्ये बंद आहेत. या कालावधीत त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदीही केली. परंतु करोनामुळे कंपनीला आपल्या अन्य बाबींमध्ये म्हणजेच वस्तूंचा पॅकिंग, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, त्यांना संरक्षण साहित्य पुरवणे आणि अधिक पैसे देणं यासर्वांमध्ये वाढ करावी लागली. या सर्व बाबींमुळे खर्चात अतिरिक्त वाढ झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. याव्यतिरिक्त काही ठिकाणी सामानाच्या विक्रीसाठी परवानगीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात घट झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार उत्तम सेवा पुरवण्यासाठी कंपनीने अधिक कर्मचाऱ्यांची भर्ती केली. तसेच अधिक काम केल्याबद्दल त्यांना मोबदलाही जास्त देण्यात आला. परंतु करोना व्हायरचा संसर्ग होण्याच्या भीतीने काही जणांनी कामावर न येण्याचाच निर्णय घेतला. यामुळे कंपनीवरील खर्च वाढला आहे. परिस्थिती पूर्वपदावर केव्हा येईल हे सांगणे कठिण असून आता याबाबत काही सांगता येणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनी दुसऱ्या तिमाहित ४०० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक गुतवणूक करणार आहे. कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ काम केल्याचा मोबदला, संरक्षण साहित्य आणि अन्य कामांसाठी ही रक्कम खर्च केली जाणार असल्याची माहिती अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांनी सांगितलं.