कॅलिफोर्निया – करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या श्वसनमार्गाच्या बाह्य आवरणाला संसर्ग होत असल्यामुळे अशा व्यक्तीला वास आणि चव समजू शकत नाही. मात्र या विषाणूच्या संसर्गामुळे श्वसनमार्गाचे कायमचे नुकसान होत नाही.
त्यामुळे आजारी पडल्यानंतर महिन्याभराने त्याला वास आणि चव समजू शकते, असे पॅथोलॉजीचे प्राध्यापक जॉन निकोलस यांनी एका मुलाखतीत सांगितले. कोविड -19 मुळे शरीरातील विविध अवयवांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी हॉंगकॉंग विद्यापीठातील निकोलस आणि त्यांच्या टीमने विषाणूच्या संपर्कात असलेल्या हॅम्पस्टरवर प्रयोग केले.
श्वसनमार्गातील पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या ओल्फॅक्टरी एपिथेलियम टिश्यू हे संवेदना यंत्रणेचे भाग असतात. त्यामुळेच माणसास अथवा प्राण्यांना “वास’ समजतो. वास आणि चव न समजणे आणि बरे झाल्यावर ही संवेदना पुन्हा पूर्ववत होणे, हे करोनाचे लक्षणच आहे. काही देशांमध्ये हे लक्षण म्हणजे रोग निदानाचे प्रमुख लक्षण मानले जाते. अशा व्यक्तींना ब्रिटनमध्ये विलगीकरणात ठेवण्याची मार्गदर्शक सूचना दिली गेली आहे.