पुणे – जिल्ह्यात आतापर्यंतच्या मृत्यू संख्येत सर्वाधिक 151 मृत्यूची आज नोंद झाली आहे. मागील तीन दिवसांपासून मृत्यूचा कहर भयानक झाला असून, दररोज 130 ते 145 जणांच्या मृत्यूची नोंद होत असे. आज मृत्यूनेही नवीन उच्चांक गाठला आहे. तर दिवसभरात नवीन 6 हजार 46 बाधित सापडले आहे.
जिल्ह्यातील दररोजच्या बाधित संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, तर करोनामुक्त व्यक्तीची संख्या वाढत आहे. दिवसभरात 8 हजार 823 बाधित करोनामुक्त झाले आहेत. ही दिलासा देणारी आकडेवारी असली तरी, जिल्ह्यात सुरू असलेला मृत्यू तांडव भयावह आहे. गेल्या 24 तासात 151 करोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुणे शहरात 56, पिंपरी- चिंचवड मध्ये 54, ग्रामीण 30, नगरपालिका 7 आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हदडीत 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
शहरात आतापर्यंत 50 ते 60 जणांच्या मृत्यूची नोंद होते. मात्र पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. ग्रामीण भागात 30 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 11 जणांचा मृत्यूचा समावेश आहे. हवेळीमध्ये 7, शिरोइर 4, दौंड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी येथे 3, मुळशी तालुक्यात 1 तर आळंदी, बारामती, चाकण, दौंड, लोणावळा, तळेगाव आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द असे मिळून 30 जणांचा मृत्यूचा समावेश आहे.