कोईंबतूर – करोनाच्या काळात सध्या लोक प्रचंड हैराण झाले आहेत. बाधितांची संख्या, सतत होणारे मृत्यु आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थितीही ढासळली आहे. त्यामुळे अनेक लोक परमेश्वराची आराधना विविध स्वरुपात करत आहेत.
अशातच तामिळनाडूच्या कोईंबतूर येथील कामठीपुरी अधिनमच्या धर्माधिकाऱ्यांनी प्राणघातक, सकल विश्वविनाशक कोरोनाव्हायरसच्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर कोविडपासून लोकांना संरक्षण देण्यासाठी “कोरोना देवी’ ही देवता तयार केली असून तिची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
या धार्मिक अधिनामचे प्रभारी शिवलिंगेश्वर यांनी असे सांगितले की, लोकांना त्रास व आजारांपासून बचाव करण्यासाठी देवतांची निर्मिती करण्याची दक्षिण भारतात प्रथा आहे. त्यानुसार या करोनादेवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये अशा अनेक देवता आहेत. कोईंबतूरमधील प्लेग मरिअम्मन मंदिर हे असेच एक उदाहरण आहे. लोकांना असा विश्वास होता की पूर्वी प्लेग आणि कॉलराच्या उद्रेकात अशा देवता नागरिकांचे संरक्षण करतात.
कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कामठीपुरी अधीनम यांनी करोनादेवीची मूर्ती तयार करण्यासाठी ग्रॅनाइट वापरले आहे. किमान 48 दिवसांची विशेष प्रार्थनाही करण्याचे त्यांनी ठरविले आहे. तसेच करोनादेवीच्या आराधनेसाठी महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार असून त्या दरम्यान लोकांना दर्शनासाठी अथवा प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जाऊ दिले जाणार नाही.
गेल्या आठवड्यात, तामिळनाडू सरकारने प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर बंदीची घोषणा करून राज्यात लॉकडाऊन तीव्र केले. ताज्या लॉकडाऊन निकषांतर्गत फक्त किराणा, भाजीपाला, मांस आणि मासे विकणाऱ्या दुकानांना सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत काम करण्याची परवानगी दिली आहे.
तामिळनाडूसह भारत आणि सकल विश्वाला या संकटातून वाचवण्यासाठी करोनादेवीच मदत करु शकते, या भावनेतून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, केरळमध्येही एका मंदिरातील पुजायाने करोनामर्दिनीची पूजा केल्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. तसेच एक अष्टभुजा देवता आपल्या हातातील विविध आयुधांनी करोनाच्या नाशासाठी सज्ज झाल्याचे एक चित्रही समाजमाध्यमांतून एकमेकांना पाठवले जात आहे.