kutimb

अमेरिकेतील करोना मृतांची संख्या 5 लाखांवर

वॉशिंग्टन – अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापिठाच्या “सिस्टीम सायन्स ऍन्ड इंजिनिअरींग’ विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. जगभरात करोनाच्या संसर्गामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 2 कोटी 81 लाखांच्यावर गेली आहे. तर अमेरिकेत मरण पावणाऱ्यांची संख्या सोमवारी 5 लाख 71 इतकी झाली असल्याचे चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने जॉन हॉपकिन्स विद्यापिठाच्या आकडेवारीच्या हवाल्याने म्हटले आहे.

अमेरिकेत आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले होते. मात्र आता मृतांच्या आकडेवारीबाबतचा अव्वल क्रमांक कॅलिफॉर्नियाच्या नावावर जमा झाला आहे. कॅलिफॉर्नियात आतापर्यंत 49,439 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा 46,917 झाला आहे. त्यापाठोपाठ टेक्‍सासमध्ये 42,291 आणि फ्लोरिडामध्ये 30,065 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी, इलिनॉय, ओहायो, जॉर्जिया, मिशिगन, मॅसेच्युसेट्‌स आणि ूरिझोना या राज्यांमध्ये 15,000 हून अधिक मृत्यू झालेले आहेत.

अमेरिकेत करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक रुग्णांचा बळी गेला आहे. अनेक महिन्यांपासून अमेरिकेतील ही स्थिती कायम राहिली आहे. जगभरातील करोनाच्या रुग्णांच्या संख्येपैकी 25 टक्के रुग्ण आणि जगभरात करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी 20 टक्के मृत्यू अमेरिकेतच झालेले आहेत. गेल्या वर्षी 27 मे रोजी अमेरिकेतील करोनाच्या मृत्यूची संख्या 1 लाख इतकी झाली होती. तर 22 सप्टेंबरला ही संख्या 2 लाख झाली. 14 डिसेंबर रोजी 3 लाख आणि या वर्षी 19 जानेवारीला मृतांच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा गाठला होता.

देशभरातील मृत्यूची संख्या 1 लाखावरून 2 लाखापर्यंत वाढण्यास सुमारे चार महिने लागले. 2 लाखावरून 3 लाखापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 3 महिने आणि 3 लाखावरून 4 लाखापर्यंत आणि 4 लाखावरून 5 लाखापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकी केवळ 1 महिन्याचा अवधी लागला. हाच वेग कायम राहिला तर 1 जून 2021 पर्यंत अमेरिकेत एकूण 5,89,197 कोविड -19 मृत्यू होण्याचा वॉशिंग्टन विद्यापीठाचा अंदाज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.