पिंपरी : करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. मात्र करोनामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. मागील काही दिवसांत करोनामुळे कुटुंबाच्या कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. त्यातच पुण्यातील बहिण-भावाचा करोना संसर्गाने एकापाठोपाठ मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काही दिवसांपूर्वीच येथील एका कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण यांना एकाच दिवशी करोनाची लागण झाली होती. यापैकी उपचारादरम्यान बहिणीचे निधन झाले. तर तिच्या दशक्रिया विधीच्या दुसऱ्याच दिवशी भावानेही अखेरचा श्वास घेतला.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील 31 वर्षीय माधवी बाळासाहेब हिंगे पाटील हिचे अकरा दिवसांपूर्वी करोनाने निधन झाले होते. तर तिचा 29 वर्षीय भाऊ मयूर बाळासाहेब हिंगे पाटील याचा शनिवारी पुण्यात करोनानेच मृत्यू झाला. दोन लेकरांच्या निधनामुळे हिंगे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
करोना संसर्गातून आई-वडील सुखरूप बाहेर पडले. मात्र माधवी आणि मयूर करोनावर मात करण्यात अपय़शी ठरले. माधवी हिचे डीएडपर्यंत शिक्षण झालं होतं. तिने ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात पदवी घेतली होती. तर मयूर कम्प्युटर इंजिनियर होता. या दोघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.