पुणे – शहरात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोमवारी दिवसभरात 1 हजार 188 जण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 5 हजार 129 संशयितांचे नमुने घेण्यात आले. तर, 1 हजार 101 करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
एकीकडे हे दिलासादायक चित्र असताना, मागील 24 तासांत 58 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 45 जण पुण्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, यामुळे पुण्यात करोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या आता 2 हजार 33 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत 4 लाख 79 हजार 24 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यापैकी बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 84 हजार 496 वर पोहचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 14 हजार 686 रुग्ण उपचार घेत आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 802 जण अत्यवस्थ आहेत, तर 487 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 315 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 67 हजार 777 झाली आहे.