शिरुर – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. रुग्णसंख्या वाढली असताना मृतांची संख्या देखील दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कुटुंबच्या कुटुंब करोनाने उध्वस्त होत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अवघ्या दोन तासांत करोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पूर्व भागातील अनेक गावांनी, वाड्या वस्त्यावर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बाभूळसर बुद्रुक येथील विठ्ठल भगवान नागवडे (५६ ) व त्यांचे लहान भाऊ सुभाष भगवान नागवडे (५३) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. दोन्ही भावांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
नागवडे कुटुंबातील विठ्ठल यांचा उपचार सुरू असतानाच केडगाव येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर अवघ्या दोन तासांतच विठ्ठल यांचे लहान भाऊ सुभाष नागवडे यांचाही मांडवगण फराटा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विठ्ठल आणि सुभाष यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुले, मुली, सूना असा परिवार आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील बाभूळसर बुद्रुक येथे अवघ्या दोन तासांच्या अंतरावर दोन सख्ख्या भावांचा करोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.