नवी दिल्ली, दि. 7- जगभऱात हाहाकार माजवणाऱ्या करोनाचा इलाज फक्त एका गोळीने होण्याच्या शक्यता भविष्यात निर्माण होण्याचा अंदाज आहे. लस तयार करणाऱ्या फायझर कंपनीने आता संसर्गबाधितांच्या उपचारांसाठी औषधही तयार केले आहे. फक्त एका गोळीने उपचार करण्याचा दावा या कंपनीने केला आहे.
एका राष्ट्रीय दैनिकातील बातमीनुसार सध्या याला PF-07321332 असे नाव देण्यात आले आहे. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत आणि या जर यशस्वी झाल्या तर घरच्या घरीच अनेक लोक बरे होतील आणि त्यांना रुग्णालयात जाण्याची गरजच भासणार नाही.
या औषधाच्या पहिल्या टप्प्यावरील चाचण्या सध्या अमेरिका आणि बेल्जियममध्ये सुरू आहेत. यात 18 ते 60 या वयोगटातील 60 निरोगी व्यक्ती आहेत. याची चाचणी जनावरांवर झाली आहे ज्यात कोणतीही वैद्यकीय जोखीम आढळली नाही.
माध्यमांच्या बातम्यांनुसार हे औषध एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अँटीरेट्रोव्हायरलसारखे औषध आहे. हे औषध शरीरात विषाणूचा स्तर इतका कमी करते की त्याला ओळखता येत नाही. यामुळे व्हायरस वाढू शकत नाही आणि इतर लक्षणांवरचे उपचार घेऊन रुग्ण बरा होऊ शकतो. एचआयव्हीशिवाय पांढऱ्या काविळीच्या उपचारांसाठीही याच तत्वावर तयार करण्यात आलेल्या औषधाचा वापर होतो.