बीजिंग- चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली असून या देशात दुसरी लाट येथील मासे आणि मटनाच्या बाजारपेठेतून वेगाने फैलत असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी आर्द्रता जास्त आणि तापमान कमी असल्यामुळे वेगाने प्रसार होत असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
चीनमध्ये उदभवलेल्या दुसऱ्या लाटेत शंभरपेक्षा जास्त बाधित सापडले असून हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. चीनच्या रोग प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्राचे अर्थात सीडीसीचे प्रमुख वू जूनयू यांनी सांगितले की विषाणूचे नवे बाधित हे शिनफेडी मार्केटमध्ये आढळून आले आहेत. येथे कमी जागेत जास्त जण काम करतात.
या ठिकाणी मुख्यत्वे समुद्री जिवांच्या विक्रीचे स्टॉल लावले जातात. त्याचप्रमाणे नव्या बाधितांमध्ये मास विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे. सी फूड मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यांत प्रथम करोनाची लक्षणे आढळून आली होती. कमी तापमान आणि ओलसरपणा यामुळे येथे विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने झाला असून याची तपासणी करणे आवश्यक आहे. चीनमध्ये युरोपातून आयात केल्या जाणाऱ्या मासळीवर बंदी आहे.
\मात्र नवी जी करोनाची प्रकरणे आढळली आहेत, ती याच आयातीशी अथवा मासळी बाजाराशी संबंधित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. या बाजारात कायमच घाणीचे साम्राज्य असते. त्याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चीनमध्ये सर्वप्र्रथम करोनाचा उद्रेक झाला होता. वुहानच्या मास बाजारातच त्याचा उगम झाला असल्याचे नंतर निदर्शनास आले होते.