परदेशगमन करून मायदेशी परतणाऱ्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे प्रमाण जास्त असल्याचं आढळत आहे. अशातच पत्नीला फसवून मैत्रिणीसोबत परदेशवारी करणं एका व्यक्तीस भलतंच महागात पडलंय. त्याचं झालं असं की, सदर व्यक्तीने पत्नीला अंधारात ठेवून मैत्रिणीसोबत इटली गाठलं होतं मात्र मायदेशी परतल्यानंतर त्या व्यक्तीस आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. कोरोनाची लागण झाल्याने आता आपलं बिंग फुटणार या भीतीने या व्यक्तीचा थरकाप उडाला असून सध्या त्याच्या पत्नीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. आपल्या पतीला इटलीवरीमुळे करोनाची लागण झाल्याची कल्पना अद्याप त्याच्या पत्नीस नसून तिला याबाबतची माहिती मिळू नये अशीच प्रार्थना तो सध्या करत आहे.
इटलीहून परतल्यानंतर करोनाची लक्षणं दिसल्याने त्याने रुग्णालय गाठलं. डॉक्टरांना आपल्या इटली दौऱ्याबाबत माहिती देताना त्याने आपण मैत्रीणीसोबत इटलीला गेलो होतो तेव्हा करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट सांगितलं. परंतु आपल्या मैत्रिणीचं नाव उघड करण्यास नकार दिला.
चीननंतर इटलीमध्ये करोनाने थैमान घातले असून बुधवारी एकाच दिवसात ४७५ जणांचा बळी घेतला आहे. जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशात करोनामुळे एका दिवसात इतके बळी गेल्याची जगातील ही पहिलीच घटना आहे. दुर्दैवाने याआधीही एका दिवसात सर्वात जास्त बळी गेल्याची घटनाही इटलीतच घडली होती. त्यावेळी एका दिवसात ३६८ जणांचा मृत्यू झाला होता.