वुहानच्या लॅबमधून करोना बाहेर पडला, त्याचे पुरावे मी पहिले – डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क : जगात थैमान घालणाऱ्या करोना विषाणू विषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा आरोप आणि दावा केला आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमधूनच करोना विषाणूची उत्पत्ती झाली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. व्हाइट हाऊसमध्ये ते बोलत होते.

वुहानच्या लॅबमधून करोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात, तुम्ही पुरावे पाहिले आहेत का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘हो, मी पुरावे पाहिले आहेत. पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही’ असे उत्तर दिले.  एका इंग्रजी वर्मनपत्राने याविषयी हे वृत्त दिले आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबने त्यांच्यावर होत असलेले आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. वुहानच्या लॅबमध्ये करोना व्हायरसचे मूळ असून तिथून करोनाच्या फैलावाला सुरुवात झाली, या आरोपात काहीही तथ्य नाहीय असे लॅबच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी रॉयटर्सला सांगितले होते.

वुहानमधल्या बाजारातून करोनाची सुरुवात झाली. प्राण्यांमधून हा आजार माणसामध्ये आला असे काही तज्ज्ञांचे मत आहे. करोनामुळे अमेरिकेत परिस्थिती हातबाहेर गेली आहे. अमेरिकेत १० लाखापेक्षा जास्त लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली असून ६३ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अपयशावर बोट ठेवत आहेत.

चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या इंटर्नकडून अपघाताने करोना व्हायरस लीक झाला असावा, असे वृत्त काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या माध्यमांनी दिले होते. त्यावर वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबवर आकसातून हे आरोप केले जात आहेत असे युआन झिमिंग यांनी म्हटले आहे. ते वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये प्राध्यापक आहेत तसेच नॅशनल बायोसेफ्टी लॅबोरटरीचे संचालक आहेत.

“असा कुठलाही विषाणू बनवण्याचा आमचा हेतू नाही आणि आमच्याकडे तशी क्षमताही नाही” असे युआन यांनी रॉयटर्सला लिखितमध्ये दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. करोनाच्या जीनोममधून हा विषाणू मानवाने बनवल्याची कुठलीही माहिती अजूनपर्यंत तरी समोर आलेली नाही’ असे युआन यांनी सांगितले.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.