पुणे – करोनाबाधितांच्या बेड मॅनेजमेंटसाठी महापालिका सहा महिन्यांसाठी खासगी एजन्सी नेमणार असून, कॉलसेंटरवर एजन्सीच्या लोकांची नेमणूक केली जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे.
करोना रुग्णाची परिस्थिती गंभीर झाल्यास कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, किंवा आयसोलेशनची सुविधा आहे याची माहिती मिळवण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन नंबर सुरू केले होते. हे कॉल अटेंड करण्यासाठी सीएसआरमधून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.
करोना प्रादुर्भाव जेव्हा खूप वाढला होता त्यावेळी सुमारे 80 ते 100 कॉल एका शिफ्टमध्ये येत होते. त्यात बाहेरगावच्या कॉल्सचा समावेश जास्त होता. हे काम तीन ते चार शिफ्टमध्ये सुरू होते.
आता कॉलची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळेच हा हेल्पलाइन डेस्क सहा महिन्यांसाठी सुरू ठेवावा लागणार असल्याची माहिती, महापालिकेतील सहआरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक यांनी दिली.