कोरोनाने पर्यटन क्षेत्राचे कंबरडे मोडले ; तब्बल पाच लाख कोटींच्या नुकसानीचा अंदाज

नवी दिल्ली : कोरोनाने भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले आहे. या विषाणूचा संसर्ग व त्यांनतर लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यातच देशांतर्गत पर्यटन आणि प्रवास क्षेत्राचे कोरोनाने पूर्ण कंबरडेच मोडले असल्याचे दिसत आहे. आता इंडस्ट्री चेंबर सीआयआय आणि हॉस्पिटॅलिटी कन्सल्टिंग फर्म हॉटेलिवेट यांच्या अहवालातुन ही माहिती समोर आली आहे. या संकटामुळे पर्यटन व प्रवास क्षेत्राचे तब्बल 5 लाख कोटी रुपये, म्हणजेच 65.57 अब्ज डॉलर्स इतके नुकसान होण्याचा अंदाज आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, केवळ संघटित पर्यटन क्षेत्राचेच 25 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आकडेवारी चिंताजनक आहे आणि आपले अस्तित्व वाचविण्यासाठी या उद्योगास तातडीने काही मदत देण्याची गरज आहे.

अहवालानुसार, सध्याचे संकट हे भारतीय पर्यटन क्षेत्रासमोरील मोठ्या संकटांपैकी एक आहे. याचा स्थानिक, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व पर्यटनाच्या प्रकारांवर परिणाम झाला आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार पुढील वर्षाच्या सुरूवातीस, हॉटेल्समधील सुमारे 30 टक्के रूम्स साठीचे बुकिंग होईल. यामुळे हॉटेल्सचे उत्पन्न 80 ते 85 टक्क्यांनी कमी होईल. या अहवालानुसार, कोरोना विषाणूच्या साथीने भारतीय प्रवास आणि पर्यटन उद्योगाचे फार मोठे नुकसान केले आहे. याचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर झाला आहे. यामुळे या उद्योगात सुमारे पाच लाख कोटी रुपये नुकसान होण्याचा अंदाज आहे.

अभ्यासानुसार, जानेवारीतल्या सर्वात व्यस्त काळात हॉटेल्समधील 80 टक्के खोल्या भरल्या गेल्या. हे प्रमाण फेब्रुवारीत 70 टक्के, मार्चमध्ये 45 टक्के आणि एप्रिलमध्ये सात टक्के झाले. मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 10 टक्के, 12 टक्के, 15 टक्के आणि 22 टक्के होते. ते वाढून सप्टेंबरमध्ये 25 टक्के, ऑक्टोबरमध्ये 28 टक्के, नोव्हेंबरमध्ये 30 टक्के आणि डिसेंबरमध्ये 35 टक्के इतके वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, याआधी संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेर्सने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या साथीमुळे या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत जागतिक पर्यटन उद्योगाला 320 अब्ज डॉलर्सची तोटा झाले आहे. यासह पर्यटन उद्योगातील 120 दशलक्ष रोजगार धोक्यात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.