करोनामुळे रिक्षाच्या चाकांना ब्रेक; चालकांवर उपासमारीची वेळ

मदतीसाठी प्रशासनाला साकडे

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील रिक्षा सुमारे ४५ दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. रिक्षा जागेवरच उभ्या असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न रिक्षाचालकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी रिक्षा चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

शहरात दररोज रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करीत होते. परंतू २० मार्चपासून आमचे वाहन जागेवरच उभे आहे. या स्थितीत बॅंकेकडून कर्ज काढून घेतलेल्या रिक्षांचे हप्ते थकले आहेत. रोज मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे या संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी सांगितले.

शहरातील अनेक रिक्षाचालक इतरांच्या भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतात. त्यातून त्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम मिळते. त्यांची तर अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रिक्षाचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी मदत करण्याची मागणी केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार परराज्यातील लोकांचा विचार करते, परंतू येथील स्थानिकांची, भूमीपत्रांची उपासमार होत असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. या रिक्षा चालकांना शासनाने तात्काळ मदत करणे गरजेचे असल्याचे मत येथील कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव प्रशांत (नाना) सातव यांनी व्यक्त केले.

येथील प्रशासनाकडे अन्नधान्याची मदत मागितली तर परप्रांतीयांसाठी ही मदत आहे, तुमच्यासाठी नाही, असे उत्तर त्यांच्याकडून दिले जात असल्याचे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने मदत केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा रिक्षाचालकांनी निवेदनात दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.