शांघाय : करोनाने संपूर्ण जगाची पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांपासून या करोनामुळे संपूर्ण जग हैराण होते. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत होते. मात्र अशातच पुन्हा एकदा जगभरात करोनाने पुन्हा एकदा धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे.
करोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनमध्ये पुन्हा करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर, शांघाय व्यतिरिक्त चीनमधील इतर देशांमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
शांघायच्या स्थानिक सरकारनं सांगितलं की, सोमवार ते शुक्रवार शांघायच्या पुडोंग आणि आसपासच्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच पीपल्स कोविडची मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जात आहे. शांघायच्या स्थानिक प्रशासनाने सांगितले की, “हुआंगपु नदीच्या पश्चिमेकडील डाउनटाउन भागात शुक्रवारपासून लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच लोकांना घरातच राहण्याचे आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जीवनावश्यक पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक कार्यालये वगळता इतर सर्व कार्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टही बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 26 मिलियन लोकसंख्या असणाऱ्या शांघायमध्ये आता अनेक सेक्टर्स बंद करण्यात आले आहेत. जागोजागी कोरोना चाचण्या करण्यासाठी तपासणी केंद्रही सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शांघायच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.