वॉशिंग्टन : अमेरिकेत करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने “कोविड-19′ या आजाराला जागतिक साथीचा रोग घोषित केल्यानंतर, तसेच या आजाराने युरोपातही अनेकजण दगावल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर अमेरिकेत करोना विषाणूने बाधितांच्या उपचार आणि सहाय्याकरता 50 अब्ज डॉलर्सचा निधी राखीव ठेवला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या सर्व राज्यांना आपत्कालीन सहायता केंद्र उभारणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी योजना आखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
“करोनाचा संसर्गामुळे परिस्थिती आणखीनच बिघडू शकते. पुढील आठ आठवडे गंभीर आहेत.’ असे व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमधील येथे पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले,
आत्तापर्यंत अमेरिकेतल्या सुमारे 2 हजार जणांना “कोविड-19′ या आजाराची लागण झाली असून, तर 41 जण दगावले आहेत. जगभरात आतापर्यंत 5 हजार जण दगावले आहेत. त्याबरोबर व्यवसायिक संपर्कावर मर्यादा आल्यामुळे जगासमोर आर्थिक मंदीचे संकटही उभे ठाकले आहे.