थिरुअनंतपूरम -झिका विषाणूच्या संसर्गाचे आणखी दोन संसर्गित केरळमध्ये सापडले. त्यामुळे बाधितांची संख्या 21 वर पोहोचली आहे. हा संसर्ग रोखण्याच्या योजनेवर केरळ सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
यातच केरळमध्ये सातत्याने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 17 आणि 18 जुलैला तेथे संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे. याच बरोबर राज्य सरकार 15 जुलैपासून कोरोनाची नवी गाइडलाइनदेखील जारी करू शकते.
केरळमध्ये बँकांना आठवड्यातून पाच दिवस कामकाजाची परवानगी आहे. त्यामुळे, संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान बँकाही बंदच राहतील. याच बरबोर आता झिका व्हायरसमुळेही केरळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पुनथुरा येथील एका 35 वर्षीय आणि सस्थमंगलम येथील 35 वर्षीय व्यक्तीला हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीला जॉर्ज यांनी दुजोरा दिला आहे. यापूर्वी एका 73 वर्षीय वृद्ध महिलेला हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.
पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवलेल्या पाच नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे जॉर्ज यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
झिका विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केरळ सरकार कृती आराखडा बनवत असून, परिस्थितीवर राज्य सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला प्रथम या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिने एका मुलाला जन्म दिला असून, दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.