शिरूर (प्रतिनिधी) – कारेगाव येथील 80 वर्षीय वृद्ध महिला करोना पॉझिटिव्ह आढळली असल्याची माहिती शिरूर प्राथमिक रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. यामुळे शिरूर तालुक्यात व शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारेगाव येथील 80 वर्षीय वृद्ध महिला छातीत दुखत असल्याने काही दिवसापूर्वी बाबुराव नगर येथील श्री गणेशा हॉस्पिटल येथे उपचारासाठी आली होती. परंतु येथे एक दिवस उपचार केल्यानंतर तिला अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु तेथून या महिलेला पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते.
तेथे उपचार करत असताना संशय आल्याने या महिलेचे नमुने करोना तपासणीसाठी पाठविण्यात आले. याचा पॉझिटिव्ह अहवाल काल रात्री (दि. १४ मे) उशिरा आल्याने कारेगाव व बाबुराव नगर शिरूर व शिरूर शहर येथे खळबळ उडाली. शिरूरजवळ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहे. दरम्यान, शिरूरमधील वैद्यकीय पथक कारेगाव येथे दाखल झाले आहे.
शिरूर येथे गणेश हॉस्पिटल येथे अनेक काम करणारे कामगार शिरूर येथील रहिवासी आहेत. तसेच बाबुराव नगर येथे मोठी वस्ती असून येथील अनेक लोक शिरूर शहरात खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.